Ticker

6/recent/ticker-posts

मानवी कृतीमुळेच प्रदूषणाचे गंभीर संकट तज्ज्ञांचा सूर : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे चर्चासत्राचे आयोजन



जनवार्ता भारत
  संपूर्ण जगात प्रदूषणाची गंभीर समस्या असून, पृथ्वीवरील एकूणच सजीवांवर याचे वाईट परिणाम होत आहे. असा एकमुखी सूर या चर्चेतून पुढे आला. आणि यावर तातडीने कारवाई करावी लागणारच आहे नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा गर्भित इशाराही वक्त्यांनी याप्रसंगी समस्त जनतेला दिला आहे.
काही भागात भौगोलिकदृष्ट्या तापमान जास्त असले तरी मानवाच्या कृतीतून व हस्तक्षेपामुळे आणखी भर पडली आहे. त्यामुळे प्रदूषणाचे गंभीर संकट उभे ठाकले.त्यामुळे मानवाने प्रदूषण कमी करण्यासाठी एकजुटीने समोर येण्याची गरज असल्याचे मत तज्ञांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राप्रसंगी व्यक्त केले.
  चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपुरातील भारती हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा अध्यक्षस्थानी तर चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश चोपणे, प्रा.डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. बालमुकुंद पालिवाल, महेंद्र राळे, मधुसूदन रुंगठा ,अ.भा.ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा संघटक दीपक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी जलप्रदूषणावर प्रकाश टाकला. शासनाने तयार केलेला अॅक्शन प्लान अंमलात आणल्यास जलप्रदूषण कमी होऊ शकते असे मत व्यक्त करतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील पाण्याचे व्यवस्थापन योग्य होत नसून, मानवाच्या भौतिक सुखासाठी नद्यांचा खून केला जात आहे अशी खंत व्यक्त करून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 
डॉ. बालमुकुंद पालिवाल यांनी प्लास्टिक प्रदूषण व प्लास्टिक चा पूनर्वापर तर मधुसूदन रुंगठा यांनी विविध उद्योगांच्या प्रदूषणाबाबत माहिती दिली.


प्रा. चोपणे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान इतर शहरांच्या तुलनेत शेकडो वर्षांपासून अधिक असल्याचे सांगितले. हे शहर १८ ते २० अक्षांशावर असल्याने भौगोलिकदृष्ट्या तापमानाचे शहर आहे. परंतु, मानवी कृतीमुळे प्रदूषणात आणखी वाढ होत असून विनाशाला कारणीभूत ठरत आहे असे स्पष्ट व परखड मत मांडले तर महेंद्र राळे यांनी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग प्रत्येक घरी करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.भविष्यात पाणी मिळण्यासाठी सर्वांनी पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवावा,असेही आवाहन त्यांनी केले. तर हे सगळे उपाय ज्या ग्राहकांसाठी केले जाणार आहेत त्या ग्राहकांना जागृत करीत त्यांचे पर्यंत ही बाब पोहोचविण्यासाठी ग्राहक पंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवून हा एक लोकचळवळीचा भाग बनेल यासाठी प्रयत्न केले जातील अशी आशा दीपक देशपांडे यांनी व्यक्त केली.
डॉ. गोपाल मुंधडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून जिल्ह्यात प्रदूषणामुळे भविष्यात होणारे परिणाम सांगितले व वेळीच सावध होण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.
या कार्यक्रमात स्वागत, परिचय, सत्कार आणि मुलाखत व मतप्रदर्शन अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन होते .
या कार्यक्रमाचे संचालन सपना नामपल्लीवार यांनी केले तर कपिश उसगावकर यांनी आभार मानले. या चर्चासत्रा दरम्यान संगीता लोखंडे, संजीवनी कुबेर, प्रा. शिफाली कुमरवार, प्रा. डॉ. शीतल वडलकोंडावार यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला व मुलाखत घेतली.
आयोजनासाठी कपिश उसगावकर व दिनेश जुमडे यांनी परिश्रम घेतले.यावेळी लॉयन्स क्लब, रोटरी क्लब,आयएमए, अ.भा.ग्राहक पंचायत, पतंजली योग समिती, ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments