Ticker

6/recent/ticker-posts

जूनगावचा अटल बिहारी हरपला, माजी सरपंच राजेश्वर पाटील पाल यांचे दुःखद निधन, जूनगावावर शोककळा

*जूनगावचा अटल बिहारी हरपला, माजी सरपंच राजेश्वर पाटील पाल यांचे दुःखद निधन, जूनगावावर शोककळा*

*वैनगंगा न्यूज नेटवर्क*
 
पोंभूर्णा /प्रतिनिधी
     पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव या गावात अटल बिहारी या टोपण नावाने ओळखले जाणारे माजी सरपंच श्री राजेश्वर पाटील पाल यांचे आज दुपारच्या सुमारास आकस्मिक निधन झाले.
      आपल्या राहत्या घरी अंगणातील खाटेवर बसून असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. लगेच ते तोंडातून लाळ गाळू लागले, ही अवस्था पाहून त्यांना ताबडतोब गावातीलच एका खाजगी गाडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु सावली पर्यंत जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सोबत असणाऱ्या नातेवाईकांनी व्यक्त केला.सावली येथील रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
      त्यांच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच गावावर शोककळा पसरली आहे.राजेश्वर पाल हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुद्धा  होते. ते काही वर्ष तंटामुक्तीचे अध्यक्ष होते. अनेक सामाजिक व धार्मिक व सर्वच क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा असायचा. कुठलेही मंगल कार्य असो किंवा दुःखद घटना असोत त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आवर्जून असायची. ते गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय गुरु भक्त होते. दररोज पहाटेला काकड आरती मध्ये सुद्धा त्यांचा वाटा असायचा.
     त्यांच्या मृत्यूने जुनगाव येथील अटल बिहारी हरपला अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.अटल बिहारी हे टोपण नाव, माजी सरपंच जीवनदास गेडाम यांनी दिल्यावरून यापुढे त्यांना अटल बिहारी किंवा अटलजी या नावाने गावात लोक ओळखायला लागले.
      त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
   
वैनगंगा न्यूज नेटवर्क तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments