Ticker

6/recent/ticker-posts

खेडी गोंडपिप्री मार्गावरील अपघातांची मालिका थांबणार का? अपघातास जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी प्रकरण जाणार न्यायालयात

  • खेडी गोंडपिप्री मार्गावरील अपघातांची मालिका थांबणार का?
  •  अपघातास जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
  •  प्रकरण जाणार न्यायालयात 

जीवनदास गेडाम, वैनगंगा न्यूज नेटवर्क

 खडी-गोंडपिपरी या राज्य महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असल्यामुळे या महामार्गावर जणू अपघातांची शृंखला सुरू झाली आहे. या अपघातांना या मार्गाचे काम करणारे ठेकेदार जबाबदार असल्यामुळे त्याचेवर कठोर कारवाई करावी व अनेक मागण्यांचे निवेदन देऊनही मग्रूर ठेकेदार कामाला सुरुवातच करत नाही आहे. अशा मग्रूर ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
      खेडी गोंडपिपरी राज्य महामार्गाच्या रुंदीकरणासाठी व रस्ता निर्मितीकरिता २१८.२१ कोटी एवढ्या मोठ्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली. सदर काम ६५ किलोमीटर लांबीचे असून हे काम आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील एस आर के या कंपनीला देण्यात आले आहे. सदर ठेकेदार अनेक आंदोलनानंतरही मूग गिळून गप्प बसून आहे. राज्य महामार्गाच्या रुंदीकरणासाठी खोदलेले खड्डे नागरिकासाठी जीवघेणे ठरले आहेत. या खोदकाम केलेल्या कामामुळे या राज्य महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत. संचार बंदीमुळे जिल्ह्यात वाहतूक बंद असल्याने मोजकेच लोक रस्त्यावरून प्रवास करत आहेत. परंतु अशातही या मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.चंद्रपूर-गडचिरोली महामार्गाला जोडून असलेल्या खेडी- गोंडपिंपरी पुढे अहेरी हा राज्य महामार्ग लागतो. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक- २ च्या कार्यक्षेत्रात असलेल्या या कामाच्या आदेशातील अटी आणि नियमाला बगल देण्यात येत आहे. नियमाप्रमाणे तीन किलोमीटर खोदकाम केल्यानंतर ते भरून झाल्याशिवाय पुढील खोदकाम करता येत नाही. परंतु सदर ठेकेदाराने या रस्त्याच्या एका कडेला सरसकट खोदकाम करून मोठमोठे खड्डे तयार करून ठेवलेले आहेत.परंतु खोदून ठेवलेल्या या खड्ड्यांच्या बाजूला कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची व्यवस्था करण्यात न आल्याने हे खड्डे अपघातांना निमंत्रण देणारे ठरले आहेत.खोदून ठेवलेले काम पूर्ण न करता जसेच्या तसे ठेवल्याने सदर मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. वर्दळीच्या असलेल्या या मार्गाने चार चाकी वाहनासह दुचाकी वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटच्या प्रकाशामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दूचाकीस्वारांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडलेले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत चार जणांना आपले जीव गमवावे लागले आहे.वारंवार आंदोलन व मागणी करूनही ठेकेदारावर व प्रशासनावर कसलाही परिणाम झालेला दिसत नसल्याने सदर प्रकरण न्यायालयात जाणार असल्याची चर्चा आहे.
      या प्रकरणात राजुरा चे आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकीय पाठबळ लाभलेल्या ठेकेदाराने विधानसभेत चर्चिल्या गेलेल्या प्रकरणाची साधी दखलही घेतली नाही. शेवटी ठेकेदाराच्या मनमानी व मग्रुरी विरोधात येत्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कंत्राटदारास सोबतच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणते वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments