Ticker

6/recent/ticker-posts

*जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर* *११ वर्ष सौर बसमध्येच मुक्काम : ऊर्जा स्वराज्य यात्रेतून करणार जनजागृती*

*जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर*

*११ वर्ष सौर बसमध्येच मुक्काम : ऊर्जा स्वराज्य यात्रेतून करणार जनजागृती*

गडचिरोली:-सुखसागर झाडे

गडचिरोली :- ग्लोबल वार्मिंग जगात गंभीर समस्या बनू पाहत आहे. ग्लोबल वार्मिंग १.५ डिग्री सेल्सिअस (IPCC अहवाल नुसार )पर्यंत पोहोचण्याआधी आपल्याकडे फक्त 8-10 वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे जलवायु   परिवर्तन  कमी करण्यासाठी आता "तात्काळ" कृती आवश्यक आहेत. ऊर्जेचा स्वराज स्वीकारणे किंवा स्थानिक पातळीवर ऊर्जेची निर्मिती आणि वापर करणे हा उपाय आहे. सौर उर्जा ही सार्वजनिक चळवळ व्हावी, यासाठी आयआयटी बॉम्बेचे प्रा. चेतन सिंह सोलंकी यांनी सौर बसद्वारे ११ वर्षांची ऊर्जा स्वराज यात्रा (2020-30) हाती घेतली आहे. या प्रवासात प्रा. सोळंकी हे तब्बल ११ वर्ष घरी न जाता सौर बसमध्ये राहून यात्रा करण्याचा संकल्प केला आहे.

प्रा. चेतन सिंह सोलंकी हे शिक्षक, शास्त्रज्ञ व संशोधक आहेत. सध्या IIT बॉम्बेमधून विनावेतन रजेवर आहेत. त्यांनी ११ वर्षांंची (2030 पर्यंत) सौर ऊर्जा बसद्वारे ऊर्जा स्वराज यात्रा सुरू केली आहे. गंभीर आणि आपत्तीजनक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, ही ऊर्जा स्वराज यात्रा 100 टक्के सौर उर्जेचा अवलंब करण्याच्या दिशेने व एक व्यापक चळवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सोलंकी यांना मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेशातील सौरऊर्जेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून गौरविले आहे. टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू आणि इंडिया टुडे यांनी प्रोफेसर सोलंकी यांना "भारतातील सौर पुरुष" म्हणून नाव दिले आहे. काही लोक त्यांना ‘सोलर गांधी’ असेही म्हणतात.
प्रोफेसर सोलंकी यांनी आयआयटी बॉम्बे येथे मोठ्या सौर प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या SOULS प्रकल्पाद्वारे त्यांनी 7.5 दशलक्ष घरांसाठी सौरऊर्जेचा वापर करून सोलर लॅप डिझाइन केले. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये IEEE चा US$100,000 डॉलरचा वैश्विक पुरस्कार , SOULS प्रकल्पासाठी पंतप्रधानांचा इनोव्हेशन अवॉर्ड, ONGC द्वारे सोलर चुल्हा डिझाईन चॅलेंजमधील प्रथम पारितोषिक, तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, दोन यंग सायंटिस्ट पुरस्कार, CSIR विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार, RE  स्किलिंग मध्ये उत्कृष्टता आणि " आटस्टैंडिंग ग्रीन एक्टिविस्ट" आदींचा समावेश आहे.
प्रा. सोलंकी हे सौर अभ्यासक्रमासाठी CBSE आणि AICTE च्या समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी 7 पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांच्या नावावर नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 100 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. चार यूएस पेटंटदेखील आहेत.
गांधीवादी आदर्शांना अनुसरून त्यांनी या जनआंदोलनाला ‘ऊर्जा स्वराज’ असे नाव दिले. त्यांची ऊर्जा स्वराज चळवळ ही ऊर्जा वापर, ऊर्जेची शाश्वतता आणि जलवायु परिवर्तन कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जागतिक स्तरावर ऊर्जा स्वराज स्थापन करण्यासाठी त्यांनी एनर्जी स्वराज फाउंडेशन (ESF) ची स्थापनादेखील केली आहे.
2019 दरम्यान, प्रोफेसर सोलंकी यांनी सौरऊर्जेचा संदेश देण्यासाठी जगभरातील 30 देशांमध्ये प्रवास केला. त्यांच्या चालू असलेल्या उर्जा स्वराज यात्रेत त्यांनी याआधीच 15 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि सहा भारतीय राज्यांमध्ये 35 हजारांहून अधिक लोकांना कव्हर केले आहे. या 11 वर्षांच्या प्रवासात, प्रोफेसर सोलंकी २८ भारतीय राज्यांमध्ये सुमारे 2,00,000 किमी अंतर कापतील, 8-10 वेळा देश ओलांडतील.
त्यांच्या यात्रेदरम्यान ते सौर ऊर्जा बसमध्येच सर्व कामे करीत आहेत.  झोपणे, आंघोळ व स्वयंपाक करणे, आणि प्रशिक्षण यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. जणू बस म्हणजे त्यांचे मोबाईल घरच आहे.


Post a Comment

0 Comments