Ticker

6/recent/ticker-posts

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा



वर्धा : हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड प्रकरणी न्‍यायालयाने आज आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली. विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने बुधवारी दोषी ठरवले होते. नगराळे हा गेली दोन वर्ष कारागृहात आहे. मात्र शिक्षा भोगताना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्‍ज्‍वल निकम यांनी दिली.

आरोपी विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी आम्‍ही न्‍यायालयाकडे केली होती. मात्र हा गुन्‍हा दुर्मिळातील दुर्मिळ नाही त्‍यामुळे याला फाशी देता येणार नाही, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केल्‍याचेही निकम यांनी यावेळी सांगितले.

हिंगणघाट येथे विकेश नगराळे याने २२ वर्षीय प्राध्‍यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. या घटनेत पीडित प्राध्‍यापिका गंभीररित्या भाजली. ७ दिवस तिने मृत्‍यूशी झूंज दिली. यानंतर तिची प्राणज्‍योत मालवली. या घटनेनंतर हिंगणघाट तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. प्राध्‍यापिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले होते. हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला ५ हजारांचा दंड व मरेपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


‘त्या’ दिवशी काय घडले होते?

प्राध्‍यापिका ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी घराबाहेर पडली होती. विकेश नगराळे तिच्या घराबाहेरच दबा धरून बसला होता. प्राध्‍यापिका वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात आली. यावेळी नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये पीडिता ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते; पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

0 Comments