Ticker

6/recent/ticker-posts

केळझर तलाठी कार्यालय समस्यांचे माहेरघर शेतकऱ्यांची पिळवणूक

 केळझर तलाठी कार्यालय समस्यांचे माहेरघर,

 शेतकऱ्यांची पिळवणूक 



*सुशी -दाबगाव :-*

केळझर येथील तलाठी कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमित न येणाऱ्या तलाठीला नागरिक वैतागून गेले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीही सुधारणा होत नसल्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.


      मुल तालुक्याच्या केळझर साज्यात अनेक गावे येत असून विविध गावातील शेतशिवार जोडल्या गेले आहेत. शेतकरी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने केळझर गावात तलाठी कार्यालय उघडले आहे. मात्र जनतेच्या सेवेसाठी असलेले तलाठी आपले प्रामाणीक कर्तव्य बजावत नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. नागरिकही मोठे हैराण झाले आहेत.कामासाठी आलेले शेतकरी तलाठी कार्यालयाच्या परिसरात आल्यानंतर 'तलाठी साहेब दिसले का’ अशी विचारणा करताना दिसतात. तलाठी व कोतवाल आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून कार्यालयात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तलाठी कार्यालय अनेकदा बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शेतकऱ्यांना सातबारा वेळेवर मिळत नसल्याचेही दिसत आहे. तर  वारसनोंदींचीही कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे मिळत नसून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. 


दिवसभर नागरिक व शेतकरी तलाठी कार्यालयासमोर थांबून तलाठी येण्याची वाट पाहतात. मात्र तलाठी कार्यालयाकडे  फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. तर कधी तलाठी तहसील कार्यालयाचे नाव समोर करून शेतकऱ्यांना आल्या पावली परतवून लावत आहे. सुशी, दाबगाव मक्ता या गावातील अनेक शेत शिवार केळझर साझ्यात येतात त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शासकीय कामकाजा करिता नेहमीच ये जा करावे लागते. सदर गावाला जाण्यासाठी वाहने मिळत नसल्याने अनेकांना पायी प्रवास करावा लागतो. परिणामी जंगल व्याप्त मार्गावरून येजा करताना वाटेत नेहमीच जंगली हिंस्र स्वापदांचा धोका उद्भवत असतो.नागरिकांना जीव मुठीत ठेवून शासकीय कामासाठी म्हणून जावे लागते. परिणामी पायी ये जा करणाऱ्यांवर अनेकां वाघाने हल्ले चढवले असल्याचे वृत्त आहे.  

         हिवाळ्याचे दिवस चालू असून अनेक नागरिकांनी शेतात भाजीपालासह कळधान्याची लागवड केली आहे. त्यातच अकाली पावसाने गेल्या काही दिवसापासून हजेरी लावली असल्याने पिके उध्वस्त झाले असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी या करिता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागत आहे.

   विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरीता दाखले तसेच नागरिकांना शासकीय कामकाजात दाखल्याची आवश्यकता असल्याने,व पीककर्ज मिळण्यासाठी सातबारावरील फेरफार, सातबारा दुरुस्ती आदी कामे करावी लागतात. परंतु या कामासाठी तलाठीच वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तसेच कार्यालय दररोज उघडत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. 


तलाठी हजर राहत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम वाढत आहे. डोंगर, टेकड्या भुईसपाट होत आहे.रेती, मुरूम उत्खनन व चोरी दिवसाढवळ्या सुरू असताना सुद्धा याचेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. अश्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठ्याची तात्काळ बदली करून केळझर साजातील शेतकरी, शेतमजूर, नागरिकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.


 ---------------------------------------


केळझर गावातील साझ्यात तलाठी वेळेवर भेटत नसल्यामुळे नागरिकांना सातबाराचे उतारे दुरुस्ती वेळेवर होत नाही. जमिनीचा दाखला व इतरही प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नाही. वारस नोंदीची कामे रखडली आहेत. तलाठी कार्यालय कधी उघडे तर कधी बंद असते. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता सदर तलाठ्यावर कार्यवाही करावी.


-सुंदर घडसे, शेतकरी, ग्रामपंचायत सुशी

----------------------------------------

     तलाठी कार्यालयात कामकाजा करिता गेल्यास तलाठी शेतकऱ्यांना सहकार्य करीत नसून उद्धट पद्धतीची वागणूक दिली जात आहे. कामासाठी गेलेल्या नागरिकांना तलाठी वेळ नाही उद्या या असे उर्मट उत्तर देत कर्तव्यातून कसूर करीत आहेत. कामे करण्याची विनंती केल्यास मी खाली नाही.कोणत्या साहेबाला माझी तक्रार करता तर करा अशी धमकी दिल्या जात असल्याने अश्या बेजबाबदार तलाठ्यावर वरिष्ठांनी कार्यवाही करावी.व केळझर साजाला दुसरा तलाठी देण्यात यावा.


  शेतकरी दाबगावं

Post a Comment

0 Comments