Ticker

6/recent/ticker-posts

मसण्याउद आणि माणूस - ज्ञानेश वाकुडकर


-
ज्ञानेश वाकुडकर
•••
(दैनिक देशोन्नती | 21.05.2022 | साभार) 
--
मसण्याऊद हा एक जंगली प्राणी आहे. तो रात्रीच्या वेळी स्मशानात जातो आणि गाडलेले मुर्दे उकरून काढून खातो, अशी दंतकथा आहे. 

पण देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहयोगी संस्थांच्या कारवाया पाहिल्या तर 
हा देश मसण्याउदांचा आहे की माणसांचा.. याबाबत संशय निर्माण व्हावा, एवढी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जिकडे तिकडे नुसती खोदाखोद सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वीचे गाडलेले मूर्दे खोदून बाहेर काढणे, हाच महत्त्वपूर्ण अजेंडा सरकारच्या लिस्ट मधे दिसत आहे. सध्याच्या राजकारण्यांची त्यावरच भिस्त आहे. 

आज आपण २१ व्या शतकात उभे आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, उद्योग, उच्च दर्जाचे शिक्षण, शुद्ध पाणी, चांगले आरोग्य, नवे संशोधन, शेतीच्या नव्या तंत्राचा शोध, वेळीच आणि स्वस्त दरात शेतीला कर्ज मिळण्याची व्यवस्था, शेतीवरील भार कमी करण्याचे उपाय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपायोजना, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करायचे प्रभावी नियोजन, ग्रामीण आणि शहरी भागातील बंद पडणाऱ्या सरकारी शाळा, त्यांचा दर्जा वाढविण्याचे प्रयत्न, हे आपल्या आणि सरकारच्या दृष्टीने आवश्यक विषय असायला हवेत. त्यावर चर्चा हवी, लेखन हवे, उपाययोजना हवी. त्याप्रमाणे सरकारी धोरण आखले गेले पाहिजे. त्यासाठी अर्थिक तरतूद असायला हवी. पण परिस्थिती मात्र एकदम उलट आहे. खुद्द सरकार मसण्या उदाच्या परंपरेचे पाईक असल्यासारखे वागते. पुतळे, मंदिर, मशीद याव्यतिरिक्त सत्ताधारी पक्षांना काही कामच उरले नाही की काय ? एखादे विद्यापीठ, एखादे मोठे हॉस्पिटल, एखादा मोठा कारखाना, एखादे धरण, एखादी प्रयोगशाळा.. यापैकी गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने नेमके काय निर्माण केले आहे?

अर्थात, राजकीय नेते आणि भुरटे चोर यातील अंतर मिटवून टाकण्याचं काम अलीकडचे सर्व पक्षीय नेते आपापल्या कर्तृत्वाने करत आहेत. त्याला काही सन्माननीय अपवाद असले तरी त्यांची संख्या मात्र नगण्य आहे. संधीसाधूपणा हाच राजकीय लोकांचा धर्म झाला आहे.

देशाच्या संसदेत सुमारे साडे पाचशे लोकांना खासदार म्हणून निवडून द्यायचे असते. त्यातूनच मंत्री आणि पंतप्रधान निवडले जातात. त्यात चुकीचे १०/२० लोक निवडून आले, तर समजण्यासारखी गोष्ट आहे. पण ४१ टक्के म्हणजेच सुमारे २२५ खासदार जर गंभीर क्रिमिनल केसेस असणारे असतील, तर ते संसदेत कोणत्या प्रकारचे कायदे करतील? हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? ह्यात सत्ताधारी पक्षाची संख्या अर्थातच सर्वात मोठी आहे. 

असे निवडून आलेले खासदार मग आपल्यावरील केसेसचा निकाल स्वतःच्या बाजूने लाऊन घेण्यासाठी साक्षीदारांना खरेदी करणार, विरोधी वकिलाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करणार, न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार, हे स्पष्ट आहे. मग त्यातून लाचखोरी, खूनाखूनी हे सारे प्रकार ओघानेच आलेत. ह्यातून त्यांना विकास कामासाठी वेळ कुठून मिळणार? उरलेल्या पैकी बरेच लोक कमिशन वसूल करण्यात गुंतलेले असतात. खऱ्या अर्थानं देशाचा, समाजाचा, विकासाचा विचार करणारे किती लोक असतील संसदेत ? आणि त्यातूनही जे कुणी असतील त्यांची संख्या एवढी नगण्य आहे, की या बजबजपुरीत त्यांचा आवाज ना सरकारला ऐकायला येत, ना जनतेला समजू शकत!

म्हणून मग जनतेला गुंतवून ठेवण्यासाठी धर्म, भाषा, जात, पात, नकली राष्ट्रवाद, मंदिर, मशिद ह्या गोष्टी सोयीच्या असतात. स्वस्त असतात. त्यासाठी ना अक्कल लावावी लागत, ना मेहनत करावी लागत. देव धर्माच्या नावावर फुकटचे अंधभक्त सहज मिळून जातात. काहीही करून देशातील वातावरण अशांत राहील, द्वेषाची गटारं भरभरून वाहात राहतील, दंगे होत राहतील, असल्या विध्वंसक वृत्तीचे रूग्ण सर्वच क्षेत्रात वाढतांना दिसत आहेत. स्वतःची विधायक दृष्टी नसलेले आणि इतरांनी केलेली चांगली कामे ज्यांना सहन न झाल्यामुळे मसाण्याउद परंपरेला साजेसे विध्वंसक काम करण्यात पुरुषार्थ मानून मोकळे होतात. संशोधनासाठी केलेले खोदकाम आणि द्वेषभावनेतून केलेले खोदकाम ह्यातला फरक त्यांना समजेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून करणे व्यर्थ आहे. 

काहीही करून सत्ता मिळाली पाहिजे. आणि मिळाली तर टिकली पाहिजे. ती दुसऱ्याच्या हातात गेली आणि त्याने जर यांची पापे उकरून काढण्याची हिम्मत केली, तर यांना एकतर फासावर किँवा जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणिव त्यांना आहे. या भीतीपोटीच धार्मिक उन्माद सतत धगधगत ठेवणे ही सध्याच्या राज्यकर्त्यांची अपरिहार्यता झालेली आहे. त्यात सामान्य माणूस उगाचच होरपळतो आहे. 

धर्म, श्रद्धा ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिकदृष्ट्या त्याचे प्रदर्शन करण्याचा अधिकार कुणालाही असता कामा नये, अशी नवी व्यवस्था स्थापित करणे, ही काळाची गरज आहे. आपण खरंच माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत का ? याचाही विचार करणे गरजेचे आहे. संतांची शिकवण अशीच वाया गेली आहे का? रंजल्या गांजल्यांच्या सेवेत देव शोधणारे संत तुकाराम आणि विश्वात्मक देवाची आराधना करणारे संत ज्ञानदेव आपल्याकडे बघून हसत असतील की रडत असतील ?

सॉरी सॉरी रे..ज्ञानिया..!

जैसा नेता, तैसे चेले
काही गधे, काही हेले
सॉरी सॉरी रे..ज्ञानिया
तुझे वेद वाया गेले !!

’धर्म’ बोलती परंतू
सारे विकृतीचे जंतू
एक शेणकिडा 'मनू'
त्याचे देशभर पणतू !!

दिसे काखेमध्ये झोळी
जणू पक्ष नव्हे, टोळी
यांच्या मुखामध्ये 'गांधी'
मेंदू ’गोडसे’ची गोळी !!

ऐसे हलकटांचे साथी
पुन्हा पुन्हा शेण खाती
तुझा 'विश्वात्मकू देवू'
गेला गिधाडांच्या हाती !!

मैत्र जडायाच्या आधी
का रे..घेतली समाधी
माझा 'तुकोबा'ही गेला
आता 'मंबाजी'ला गादी !

तुकारामा, ज्ञानेश्वरा
या हो..या हो.. त्वरा करा
झाडू, पुसू या आभाळ
..पुन्हा लावू या मोगरा !!

तूर्तास एवढेच..
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर 9822278988
•••
• ’लोकजागर’ मिशन समजून घेण्यासाठी 'समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत' हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या. 
• पुस्तकांसाठी संपर्क - 9503144234 (पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲप करण्यासाठी)
• फोन पे साठी - 9822278988 
• किंमत - २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
•••
टीप - माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही. 
•••
संपर्क - 
लोकजागर अभियान
• 8446000461 • 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116

Post a Comment

0 Comments