पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा पोंभूर्णा तालुक्यातील लिलावात निघालेल्या घाटातून मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार चालू असून गैरप्रकार करून शासकीय नियमांना डावलून बेरोजगारांना अधिक बेरोजगारीत ढकलून ठेकेदार मग्रुरी करताना दिसत आहेत; व शासनही हतबल असल्याचे चित्र आहे.
लिलाव धारक ठेकेदार शासनाच्या अटी व शर्ती च्या आधारे लिलाव सोडवून घेतात, मात्र नियम अटी व शर्ती बाजूला सारून लिलाव धारक आपल्या मनमर्जी ने पोकलॅण्ड व जेसीबी च्या साह्याने रेती उपसा करीत असल्याने नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. लिलाव धारक यंत्राच्या साह्याने रेती उपसा करीत असल्याने शेकडो मजूर बेरोजगार होऊन घरी बसले आहेत. त्यामुळे अनेक कामगारावर उपासमारी ची पाळी आली आहे. थोरला नावाच्या महामारी ने आधीच बेरोजगारांचे कंबरडे मोडले आहे तर अनेक कुटुंब उध्वस्त ही झालेले आहेत अनेकांच्या घरी चुलिही पेटत नाही.अनेक कामगारांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात भटकंती करीत आहेत.
लिलाव धारक सीमांकन करून दिलेल्या ठिकाणातून रेती उपसा न करता शासनाच्या राखीव जागेतून रेती उपसा करून रेती चोरी करीत असल्याचा निवेदनातून आरोप करण्यात आलेला आहे. वाहनाच्या क्षमतेप्रमाणे रेती वाहनात न भरता ओव्हरलोड रेती वाहतूक करीत असल्याने पोंभूर्णा तालुक्यातील नवनिर्मित रस्ते ओवरलोड वाहतुकीमुळे उखडल्या जात आहेत. रेती उपसा सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत करण्याची परवानगी असताना सर्व नियम मोडून रात्रीबेरात्री रेती उपसा व वाहतूक होत असल्याने परिसरातील नागरिकांची सुद्धा झोप उडाली असून धूळ व प्रदूषणाचा फटका सर्व साधारण नागरिकांना बसत आहे, असेही निवेदनातून म्हटले आहे. अवैध ,गैरप्रकार करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून पोकलांड, जेसीबी व इतर साहित्य जप्त करण्यात यावेत. रेती भराई साठी पोकलॅन्ड आणि जेसीबी बंद करून बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देण्यात यावा, अशी मागणी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चा पोंभुर्णा चे उपाध्यक्ष,राहुल पाल जुनगाव, विश्वेश्वर भाकरे, शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम जुनगाव, खुशाल भोयर, गजानन येलपूलवार, व शेकडो कामगार उपस्थित होते.
आमदार महोदयांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधितांना कारवाईचे आदेश देण्याचे सुचविले. सदर गोरखधंदा बंद न झाल्यास सर्वपक्षीय मोर्चा तहसील ऑफिस वर काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.


0 Comments