Ticker

6/recent/ticker-posts

Current l satara l death l *⭕एकाच कुटुंबातील तिघांचा विजेचा करंट लागून मृत्यू |*



जनवार्ता भारत
सातारा : फुले तोडण्यासाठी विहिरीजवळ गेल्यानंतर वीजेचा शॉक लागून माय-लेकरासह एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना तासवडे (ता. कराड) येथे घडली असून या घटनेत अन्य दोनजण जखमी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हिंदुराव मारूती शिंदे (वय ५८), शुभम सदाशिव शिंदे (वय २३) आणि सीमा सदाशिव शिंदे (वय ४८) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर निलेश शिंदे आणि विनोद शिंदे हे दोघे जखमी झाले आहेत. गावचे पोलिस पाटील शहाजी पाटील यांनी तळबीड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.


सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रघुनाथ गणपती जाधव यांच्या विहिरीजवळ हिंदुराव शिंदे आणि शुभम शिंदे हे दोघे फुले तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अचानकपणे शॉक लागला. हा विजेचा धक्का एवढा जबरदस्त होता की ते दोघेही विहिरीत फेकले गेले. त्यामुळे दोघांना काय झाले? हे पाहण्यासाठी शुभमच्या आई घटनास्थळी धावल्या आणि त्यांनाही शॉक बसून त्या सुद्धा विहिरीतील पाण्यात पडल्या. या घटनेची माहिती समजताच गावातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तर शॉक लागून तिघांचा विहिरीतील पाण्यात मृत्यू झाला होता.


दरम्यान, याच कालावधीत त्या ठिकाणी निलेश शिंदे, विनोद शिंदे हे घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी निलेश शिंदे आणि विनोद शिंदे यांनी विहिरीजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. त्यामुळे त्या दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. या दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments