Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठलाला वाचवा रे..! - ज्ञानेश वाकुडकर

विठ्ठलाला वाचवा रे..!
-


ज्ञानेश वाकुडकर
•••
थेट गाभाऱ्यापर्यंत वावर असलेले बडवेच जेव्हा फितुरी करतात, तेव्हा कोणत्याही विठ्ठलाच्या पायाखालची विट थरथरणे स्वाभाविक आहे. अशावेळी सर्वात जास्त धक्का वारकऱ्यांना बसत असतो. विठ्ठल शेवटी विठ्ठल असतो. किंबहुना असे बेइमानीचे असंख्य धक्के पचवून आपले स्थान कायम ठेवणे, हीच विठ्ठल असण्याची परीक्षा असते. अशी परीक्षा दिल्याशिवाय कोणत्याही विठ्ठलाचे महात्म्य सिद्ध होत नाही.

सध्या शिवसेना धोक्यात आलेली दिसते. पण शिवसेना म्हणजे पंढरपूर नव्हे. उद्धव ठाकरे म्हणजे विठ्ठल नव्हेत आणि शिवसैनिक म्हणजे वारकरी नव्हेत. राजकीय वतनदारी आणि सत्तेतील वाटा, त्यातून येणारी मलाई हा खरा संघर्षाचा मुद्दा आहे. 

शिवसेनेला पक्ष फुटीचे धक्के अनेकदा बसलेले आहेत. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी सेनेला मोठा धक्का देण्याचे प्रयत्न केले आहेत. एकनाथ शिंदे यांची ही चौथी बंडखोरी म्हणावी लागेल. पण ह्या मागे कसलाही विचार, नीतिमत्ता वगैरेंचा मुद्दा नाही. त्या केवळ बोलण्याच्या गोष्टी असतात. हिंदुत्वाची नेमकी व्याख्या तरी या बडव्यांच्या कळपातील कुणाला सांगता येईल का?

वैचारीक मतभेद काहीही असू द्या, पण शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य माणसाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमदार, खासदार, मंत्री बनवलं हे वास्तव आहे. जे लोक पंक्चर दुरुस्ती, बोर्ड पेंटिंग, पान टपरी चालवत होते, सट्टा, चाकुबाजी असल्या क्षेत्रात मास्टर होते, त्यांना सत्तेचा राजमार्ग दाखवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं, हे नाकारता येणार नाही. आणि तरीही त्यांच्यावर ’अन्याय वगैरे झाला’ असा कांगावा हास्यास्पद आणि संतापजनक आहे. शिवाय ह्या लोकांच्या सत्तेत जाण्यामुळे सामाजिक पातळीवर काहीही फायदा झाला नाही. शिवसेनेकडे आर्थिक, सामाजिक विकासाचा कुठलाही अजेंडा तेव्हाही नव्हता, आताही नाही. ती एक भावनात्मक चळवळ आहे. म्हणूनच तिची धाव ’शिव वडापाव’ ’शिव भोजन थाळी’ ’झुणका भाकर केंद्र’ या पलीकडे जातांना दिसत नाही. तो त्यांचा आवाकाही नाही. आणि त्यांना त्यात इंटरेस्ट देखील नाही. त्यांच्या खाजगी तिजोरीतील नळ अखंड सुरू राहिले म्हणजे त्यांना चंद्रभागेच्या पुरापेक्षा जास्त आनंद होतो.

’सत्तेच्या दलालित माझा वाटा किती’ यासाठीच यांचे सारे प्रयत्न सुरू आहेत. तोच यांचा खरा धर्म आहे! खरं तर ही महाराष्ट्राशी बेइमानी आहे. जनतेशी गद्दारी आहे. त्याला खतपाणी घालण्याचं काम अर्थातच भाजपा करत आहे. भाजपाच्या राजकारणाचा पायाच मुळी ब्लॅकमेलिंग, कारस्थान हा आहे. पण जर भानगडी नसतील तर घाबरण्याचं कारणही नाही.

निवडून दिलेला आमदार हा जनतेचा प्रतिनिधी असतो.. मालक नव्हे! लोकशाही मधे जनता हिच मालक असते, जनता हिच ’जनार्दन’ असते.. जनता हिच ’विठ्ठल’ असते! बडवे म्हणजे ’विठ्ठल’ नव्हे. आणि बडव्यांची पापं म्हणजे वारकऱ्यांची पापं नव्हेत! मात्र बडव्यांच्या बदमाशा हाणून पाडण्यासाठी वारकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे, हेही आवश्यक असते! खुद्द विठ्ठलाने देखील बेसावध राहून चालणार नाही. आपल्या चुका दुरूस्त केल्या पाहिजेत! 

गद्दारीचा हा रोग केवळ शिवसेना किंवा एखाद्या नेत्यापुरता मर्यादित नाही. सारी लोकशाही यंत्रणाच पोखरली गेली आहे. पक्ष कोणताही असो, बहूतेक नेते भ्रष्ट आहेत. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री केवळ दलाली खाण्यात गुंतलेले आहेत. आणि जनता मात्र बडव्यांनाच विठ्ठल समजून भक्तीत गुंतली आहे. वारकरी धोक्यात आहेत, पंढरी धोक्यात आहे, खुद्द विठ्ठलही धोक्यात आहे..! एकूणच हा प्रलयाचा काळ आहे!

तूर्तास.. विठ्ठलाला वाचविण्यासाठी जाणत्या वारकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे! पंढरीही वाचवली पाहिजे! विठ्ठलही वाचला पाहिजे!
-
ज्ञानेश वाकुडकर,
लोकजागर
9822278988
•••
• ’लोकजागर’ मिशन समजून घेण्यासाठी 'समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत' हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या. 
• पुस्तकांसाठी संपर्क - 9503144234 (पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲप करण्यासाठी)
• फोन पे साठी - 9822278988 
• किंमत - २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
•••
टीप - माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही. 
•••
संपर्क - 
लोकजागर अभियान
• 8446000461 • 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116

Post a Comment

0 Comments