Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस हवालदार यांची आत्महत्या: पोलिस विभागात खळबळ





पुसद (जि. यवतमाळ) : पोलिसांवरील कामाचा ताण सर्वांनाच माहिती आहे. ते तणावातून काही कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळूनही कर्मचारी आत्महत्या करतात. अशीच एक घटना येथे काल घडली. बिटरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस जमादाराने राहत्या घरी लुंगीने गळफास लावून आत्महत्या केली. मृत्युपूर्व लिहिलेल्या पत्रात त्याने पोलिस अधीक्षकांना दोषी धरले आहे.

काल शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता पुसद (Pusad) येथील लक्ष्मीनगरात ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी दोन पानांचे पत्र लिहून घटनेला पोलिस (Police) अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू सखाराम कोरडे (वय ५४, रा. पुसद) असे मृत पोलिस जमादाराचे नाव आहे. विष्णू कोरडे हे आजारपणामुळे सुटीवर होते. त्यांनी दोन पानांच्या मृत्युपूर्व चिठ्ठीत यवतमाळचे (Yavatmal) पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले.

कोरडे हे यवतमाळ पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ते महागाव येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात निलंबित झाल्याने त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलिस मुख्यालयात करण्यात आली. चौकशीनंतर बिटरगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. दरम्यान, कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात होऊन मणक्यास जबर मार लागला. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने त्यांनी पुसद येथे बदली करण्याची व वैद्यकीय देयके मंजूर करण्याची विनंती पोलिस अधीक्षकांकडे केली होती. मात्र, पोलिस अधीक्षकांनी बदली केली नाही व वैद्यकीय देयकांवर स्वाक्षरीही केली नाही, असा आरोप कोरडे यांनी मृत्युपूर्व चिठ्ठीत केला आहे.

शवविच्छेदन झाल्यानंतर विष्णू कोरडे यांच्यावर हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, आई, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. पुसद शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
गुन्हेगार महत्त्वाचे आहेत काय?

गुन्हेगार महत्त्वाचे आहेत काय? पोलिस नाही काय?, असा प्रश्न जमादार विष्णू कोरडे यांनी आपल्या मृत्युपूर्व चिठ्ठीत विचारला आहे. आपल्या आत्महत्येस जिल्हा पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप मृत्युपूर्व चिठ्ठीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

सीबीआय चौकशीची चिठ्ठीत केली मागणी..

आपल्या मृत्यूस पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करीत विष्णू कोरडे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली तरच आपल्याला न्याय मिळेल, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

Post a Comment

0 Comments