Ticker

6/recent/ticker-posts

*दुर्दैवी! ट्रकने बैलबंडी ला दिली धडक : पत्नीचा जागीच मृत्यू तर पती जखमी*


गडचिरोली : शेतातून काम करून सायंकाळी घराकडे परत येत असताना वाटेत बैलबंडी भेटली. याच बैलबंडीची लिफ्ट शेतकरी दाम्पत्याने घेतली; परंतु ही लिफ्ट एवढी महागात पडेल, याची यत्किंचितही कल्पना त्यांना नव्हती. काळाने हाक दिल्याप्रमाणेच त्यांनी बैलबंडीचा आश्रय घेतला; परंतु मागून येणाऱ्या ट्रकने बैलबंडीला जाेरदार धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती किरकाेळ जखमी झाला. ही घटना मुरूमगाव-धानाेरा मार्गावर मंगळवार, ३१ मे राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली

निर्मला सीताराम माेहुर्ले (५५, रा. नवा फलाट, धानाेरा) असे ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. पेरणीपूर्व हंगामातील शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेतकरी सकाळी तसेच दुपारी अशा दाेन पाळीत शेतात कामे करीत आहेत. निर्मला व सीताराम हे शेतकरी दाम्पत्य आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले हाेते. सायंकाळ हाेताच त्यांनी आपले काम आटाेपते घेतले व पायीच निघाले. दरम्यान, त्यांनी मार्गावरून जाणाऱ्या बैलबंडीचा आश्रय घेतला. परंतु त्यांना काय माहीत की आपण ‘काळा’च्या पाठीवर स्वार हाेऊन जात आहाेत. शेवटी काय तर याचवेळी मुरूमगाव मार्गाने धानाेराकडे येणाऱ्या ट्रकने बैलबंडीला सालेभट्टी गावाजवळील पुलालगतच्या वळणावर मागील बाजूने जाेरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त हाेती की, सीताराम माेहुर्ले हे रस्त्याच्या पलीकडे उसळून पडले तर निर्मलाबाई रस्त्यावर काेसळल्या. त्यामुळे भरधाव ट्रक निर्मलाबाईंच्या अंगावरून गेला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गंभीर अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक भरधाव वेगात ट्रकसह पसार झाला. या घटनेत सीताराम माेहुर्ले यांना किरकाेळ तर बैलबंडीचालकाला काहीच दुखापत झाली नाही. काळ आला म्हणूनच ते बैलबंडीवर बसले, असा भावनिक शाेक लाेकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments