Ticker

6/recent/ticker-posts

*Big breaking*



चंद्रपूर:विविध राजकीय सभा, आंदोलने, टीका, आरोप, प्रत्यारोप, ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, अयोध्या भेटी, ईडी, इत्यादी घडामोडींनी राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ह्यांना थेट आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर आली असल्याची चर्चा सुरू झाली असुन ही ऑफर काँग्रेस चे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व लोकमत वृत्त समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा ह्यांच्या माध्यमातून आली असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

माजी खा. विजय दर्डा ह्यांना आम आदमी पक्षाने राज्यसभेवर पाठविण्याचा शब्द दिला असल्याचेही माहितगार सूत्रांनी कळविले असुन त्याबदल्यात आम आदमी पक्षाला राज्यात पाय रोवण्यास मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे कळले असुन त्याचाच भाग म्हणुन आ. किशोर जोरगेवार ह्यांना विजय दर्डा ह्यांनी मोबाईल वर झालेल्या चर्चेत ऑफर दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र विजय दर्डा ह्यांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे तर आ. किशोर जोरगेवार ह्यांनी चर्चा झाल्याचे मान्य केले आहे.

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी काँग्रेस नेते व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे प्रयत्न सुरू असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

दर्डा यांच्या माध्यम समूहाकडून आयोजित एका कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नुकतेच नागपुरात आले होते. या दौऱ्यात ‘आप’ च्या महाराष्ट्रातील पक्ष बांधणीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. केजरीवाल यांच्याशी चर्चेनंतर विजय दर्डा यांच्या पुढाकारातून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना ‘आप’ च्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु त्यांनी अद्याप ती स्वीकारलेली नाही.
 
याबाबत आमदार जोरगेवार म्हणाले, विजय दर्डा यांनी माझ्याशी संपर्क साधून ‘आप’ कडून प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्याबाबत आणखी चर्चा करावी लागेल. यापूर्वी अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही ‘आप’ कडून मला असाच प्रस्ताव देण्यात आला होता. दरम्यान, ‘आप’ ने ‘पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात पक्ष वाढवायचा असेल तर अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता पक्षाकडे असायला हवा, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विदर्भातील काँग्रेस नेते व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्यामार्फत महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची योजना पक्षाने आखल्याचे कळले आहे.

मी शर्यतीत नाही. मी राज्यसभा निवडणूक लढणार नाही किंवा आम आदमी पार्टी किंबहुना इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी माझ्या वृत्तपत्रातील कामाचा आनंद घेत आहे. ही चर्चा कुठून आली याची मला माहिती नाही. वास्तविक मी चर्चा करणारा मनुष्य नाही. मी राज्यसभेच्या तीन निवडणुका लढल्या, पण त्यासाठी देखील कधी आमदारांशी चर्चा केली नाही.
विजय दर्डा,
काँग्रेस नेते व माजी राज्यसभा सदस्य.
==============================
विजय दर्डा यांनी माझ्याशी संपर्क साधून ‘आप’कडून प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. परंतु, एवढा मोठा निर्णय फोनवरील चर्चेने होत नाही.

किशोर जोरगेवार

आमदार, चंद्रपूर.
==============================

Post a Comment

0 Comments