Ticker

6/recent/ticker-posts

*घनकचरा व्यवस्थापन केंद्रावरील कंपोस्ट खत चोरी प्रकरण* -------------------------------------------------------------- *▪पोंभूर्णा शिवसेना नगरसेवकांची पोलीसात धांव..*




*पोंभूर्णा/१७ मार्च.*

पोंभूर्णा नगरपंचायत नगराध्यक्षांचा व त्यांच्या पतीचा आणखी शिमगा होणार असल्याचे परत एकदा चिन्हं दिसू लागली आहेत. दिनांक ९ मार्च ला जिल्हा नगर प्रशासन अधिकाऱ्यांकडे कंपोस्ट खत चोरी प्रकरणाची तक्रार करून चौकशीची मागणी केल्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी दिनांक १० मार्च ला पत्रकार परिषदेत नगराध्यक्षाच्या पतीवर कंपोस्ट खत चोरीचा सनसनाटी आरोप केला होता. एवढेच नव्हे तर दिनांक १२ मार्चच्या पालकमंत्र्यांच्या पोंभूर्णा दौऱ्यादरम्यान त्यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. वेळीच दखल घेत पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे शिवसेना नगरसेवकांकडून सांगण्यात आले. नगराध्यक्षा व त्यांच्या पती मागचे घनकचऱ्याचे घनचक्कर संपता संपत नसतांना आता शिवसेना नगरसेवकांनी पोंभूर्णा ठाणेदार व पोलिस अधिक्षकांकडे त्याच प्रकरणाची संयुक्त स्वाक्षरीनिशी तक्रार केल्याचे सांगत नगराध्यक्षा व त्यांच्या पतीचा आणखीनच ताप वाढवला आहे. 

तक्रारकर्ते शिवसेना नगरसेवक आशिष कावटवार, गणेश वासलवार, बालाजी मेश्राम, अभिषेक बद्देलवार, रामेश्वरी वासलवार या सर्वांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे या पाचही नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील कंपोस्ट खत निर्मिती युनिटची पाहणी केलेली आहे. पाहणी दरम्यान त्यांना सन २०१५-२२ पर्यंत घनकचऱ्यापासून तयार केलेला शेकडो बॅग कंपोस्ट खत चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या धक्कादायक प्रकाराबाबत नगरपंचायत पोंभूर्णा येथील अभिलेख  पडताळणी केले असता कंपोस्ट खताच्या बॅग संबंधाने अभिलेखात कसलीही नोंद आढळून आली नाही. अधिक चौकशीअंती कंपोस्ट खत निर्मिती केंद्रातील शेकडो बॅग कंपोस्ट खत नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून तक्रारीतील गैरअर्जदार नंबर-१ नगराध्यक्षाचे पती गुरूदास दादाजी पिपरे यांनी गैरअर्जदार नंबर-२ अस्मित वसंत वाळके यांच्या साहाय्याने, नगरपंचायत कार्यालयाच्या मालकीच्या जेसीबी यंत्राच्या मदतीने शेकडो बॅग कंपोस्ट खत मौजा-पोंभूर्णा येथील भुमापन क्रमांक  १०७५/५ आराजी ०.४३ हेआर. जमीन मालक गुरूदास दादाजी पिपरे  यांच्या शेतजमीनीत गैरकायदेशीर पसरविण्यात आल्याचे आढळून आले, असे शिवसेना नगरसेवकांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. 

एकंदरीत गैरअर्जदार नगराध्यक्षाचे पती गुरूदास दादाजी पिपरे यांनी नगरपंचायत  प्रशासनाच्या मालकीचा ,शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्माण करण्यात आलेल्या शेकडो बॅग कंपोस्ट खताची चोरी करून स्वताच्याच हितासाठी उपयोग करून घेतला आहे. गैरअर्जदारांच्या कृत्याने अनेक शेतकऱ्यांना कंपोस्ट खतापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे कंपोस्ट खत चोरी प्रकरणी गुरूदास पिपरे व ज्यांचे  सहकार्याने चोरी करण्यात आली असे अस्मित वसंत वाळके व इत्तरांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी पोंभूर्णा शिवसेना नगरसेवकांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीतून केली आहे. 🔅
================================

Post a Comment

0 Comments